*नागरिकावर दादागिरी करणाऱ्या पोलिसावर कडक कारवाई करा – माहिती अधिकार नागरिक समूहाची नागपूर पोलीस आयुक्तांकडे मागणी*

नागपूर, प्रतिनिधी: नागपूर शहरातील एका पोलिस अधिकाऱ्याच्या उद्धट आणि दादागिरीपूर्ण वर्तणुकीविरोधात माहिती अधिकार नागरिक समूहाने कडक भूमिका घेतली आहे. या संदर्भात नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांना ईमेल द्वारे तक्रार करून संबंधित पोलिसावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही घटना सोशल मीडियावर देखील चांगलीच गाजत आहे. नागपूरमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने विना हेल्मेट दुचाकी चालवत असताना, काही जागरूक नागरिकांनी थांबवून त्याच्याकडे विचारणा केली की, “आपण हेल्मेट का घातले नाही?” यावर संबंधित पोलिसाने संतप्त प्रतिक्रिया देत नागरिकांशी उद्धटपणे वागणूक दिली.
नागरिकांनी केलेल्या या साध्या प्रश्नावर संबंधित पोलिसाने आपली बुलेट गाडी थांबवून नागरिकाला मारहाण केली. एवढेच नाही तर उलट “नागरिकाने आम्हाला शिवीगाळ केली” असा खोटा आरोप करत, पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सामान्य नागरिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर संबंधित पोलीस कर्मचारी म्हणाले की, “मी हेल्मेट घालणार नाही, काय करायचे ते करा!” हे वर्तन अत्यंत असभ्य आणि पोलिस दलाच्या प्रतिमेला काळीमा फासणारे आहे.
या प्रकारामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून राज्य शासनाच्या कार्यपद्धतीवरही संशय निर्माण झाला आहे. “प्रजाही राजा आहे आणि हा राजा प्रशासनाला जाब विचारू शकतो,” असे म्हणत माहिती अधिकार नागरिक समूहाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. नागरिकांनी विचारणा केल्यावर त्यांना दबावाखाली आणणे, हे केवळ अन्यायकारकच नाही तर कायद्याविरुद्धही आहे.
या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार समूहाने पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांना ईमेल द्वारे तक्रार दाखल केली असून, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर त्वरित आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पोलिस दलाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.