एरंडोल नगरपालिकेतर्फे पावसाळ्या पूर्वी स्वच्छता अभियानाला गती

एरंडोल : पावसाळ्याच्या तोंडावर एरंडोल नगरपालिकेतर्फे शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता अभियान युद्धा पातळीवर राबवण्यात येत आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे सुरुवातीला या अभियानाला काही प्रमाणात खीळ बसली होती, मात्र पाऊस थांबताच आता या कामाला गती देण्यात आली आहे.
शहराच्या प्रमुख भागांतील मुख्य नाले आणि गटारांची स्वच्छता मोहीम आता पूर्ण झाली आहे. या मोहिमे-अंतर्गत जवळपास १५ ट्रॉली कचरा आणि गाळ गोळा करण्यात आला आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली.
पुढील टप्प्यात डास-मच्छर निर्मूलनासाठी फवारणीः स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर शहरात डास आणि मच्छर यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या फवारणी मोहिमेची सुरुवात २ जून, २०२५ पासून पुरे भागातून होणार आहे.
स्वच्छता केलेल्या प्रमुख भागांचा तपशीलः
या अभियानांतर्गत सीताराम बिर्ला नगरमधील नाला, अमळनेर दरवाजा परिसरातील नाला, नागोबा मढी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील गटार, कासोदा दरवाजा परिसरातील गटार, मेन रोडवरील
गटार आणि नवीन वसाहतीतील गटारांची साफसफाई व गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग म्हणून हे अभियान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिश्रमः मुख्याधिकारी
अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, स्वच्छता निरीक्षक जीवन जाधव आणि सर्व स्वच्छतादूत या स्वच्छता मोहिमेसाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे एरंडोल शहर पावसाळ्यासाठी सज्ज होत आहे.