रवंजे येथे घराजवळील धोकादायक निंबाचे झाड ५ मे पर्यंत न काढल्यास जेष्ठ नागरिक रहिवासी ८ मे रोजी करणार आत्मदहन…..!

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील रवंजे बु.येथील जेष्ठ नागरिक रहिवासी हिरामण हरिभाऊ चव्हाण यांच्या घरास लागून जुने निंबाचे झाड असून गेल्या वर्षी झाडाच्या फांद्या घरावर पडून शोपडदीचे नुकसान झाले होते.सुदैवाने जिवीतहानी टळली होती.सदर झाड जीर्ण व पुर्ण वाकलेले असून हे झाड भविष्यात कोसळून जिवीत व वित्तहानी होऊ शकते.सदर झाड पाडण्यासाठी विविध यंत्रणांकडून परवानग्या मिळाल्या आहेत.

त्यांची मुदत संपत आली तरी सुद्धा स्थानिक सरपंच हे मनमानी करून झाड पाडण्याबाबत हेतुत: दुर्लक्ष करीत आहेत.सदर झाड ५ मे २०२५ पर्यंत काढण्यात यावे.अन्यथा ८ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता एरंडोल पंचायत समिती कार्यालयासमोर आपण आत्मदहन करणार आहोत असा इशारा पिडीत जेष्ठ नागरिक हिरामण चव्हाण यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, एरंडोल यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाच्या प्रती स्थानिक ग्रामपंचायत सरपंच नामदेव माळी, ग्रामसेवक, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.जळगांव, तहसीलदार एरंडोल व पोलीस निरीक्षक, एरंडोल यांना पाठविण्यात आले आहे.विशेष हे की सदर पिडीत जेष्ठ नागरिक हे सेवानिवृत्त शाखा अभियंता आहेत.तरी सुध्दा त्यांना स्थानिक सरपंचाकडून अन्यायकारक वागणूक मिळत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रकरणी सरपंच नामदेव माळी हे मला व माझ्या परिवाराला खुनाच्या धमक्या देत असून लोकांना धमकावून आमच्यावर हल्ला घडवून आणण्याचा प्रकार घडला आहे.असे निवेदनात नमूद केले आहे.याबाबत संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी सरपंच व ग्रामसेवक यांना वेळोवेळी भेटलो असता वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.असे निवेदनात म्हटले आहे.सदर झाड न काढण्यामागचे कारण व राजकारण नेमके काय? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.