गेल्या 23 दिवसापासून 10 गावांचा शेती वीज पुरवठा बंद*
*रिंगणगाव वीज उपकेंद्राचा भोंगळ कारभार

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील पूर्वोत्तर पट्ट्यातील गिरणा काटा लगत असलेला हा परिसर ‘ग्रीन झोन’ म्हणून ओळखला जातो. मात्र या परिसरातील रिंगणगाव येथील वीज उपकेंद्र अंतर्गत दहा गावांमध्ये 23 दिवसापासून शेती वीज पुरवठा बंद असून शेतकरी वर्ग कमालीचे संतप्त झाले आहेत.
दि. ११ जून रोजी आलेल्या चक्रीवादळाने रिंगणगाव परिसराला जोरदार तडाखा बसला. परिणामी परिसरातील वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. चार दिवसाच्या प्रतीक्षेनंतर गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र शेती शिवारातील वीज पुरवठा वादळाला 23 दिवस उलटूनही अद्याप पर्यंत खंडीतच आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला असून अशी वेळ परिसरात पहिल्यांदा आले आहे असे बोलले जात आहे.
*फवारणीसाठी पाणी आणायचे कुठून?*
पेरण्या झाल्या आता आंतर मशागतीनंतर पिकांसोबतच तनाने व विविध रोगराईने डोके वर काढले असून तन नाशक व कीटकनाशकांच्या फवारण्या करणे निकडीचे आहे. विजे अभावी मात्र शेती वीज पंपच बंद असल्यामुळे फवारण्यासाठी पाणी आणायचे तरी कुठून असा संतप्त प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. वेळेवर फवारण्या न झाल्यामुळे तन व रोगराईमुळे पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.
*विजे अभावी कांदा लागवड धोक्यात*
खर्ची, रवंजे, रिंगणगाव, पिंपळकोठा प्र.चा. हे गाव जिल्ह्यात कांद्याचे आगार म्हणून ओळखले जातात. पेरणी आटोपताच कांद्याचे बियाणे टाकावे लागते. बियाणे वाफ्यात टाकल्याबरोबर त्याच दिवशी त्याला पाणी द्यावे लागते. मात्र वीज पंपच बंद असल्यामुळे महागडे कांदा बियाणे शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. खंड पावसातच बियाणे टाकणे गरजेचे असते. पुढे जोरदार पाऊस सुरू झाल्यास अजून उशीर होऊन कांदा लागवड धोक्यात येणार आहे.
*खंड पावसामुळे पूर्व हंगामी कापूस लागवडीस पाण्याची गरज*
गेल्या वर्षी विहीरीनां जेम तेम पाणी साठा होता. मात्र यावर्षी विहिरींची पाणी पातळी टिकून आहे. त्या भरवशावर परिसरात मोठ्या प्रमाणात पूर्व हंगामी कापूस लागवड करण्यात आली आहे. खंड पावसामुळे मका, कापूस या पिकांना पाण्याची नितांत गरज भासत आहे. विहिरीत पाणी असूनही शेतीपंप बंद असल्यामुळे कोमेजलेल्या पिकांकडे पाहत बसण्याशिवाय शेतकऱ्यासमोर पर्याय नाही.
*गुराढोरांना पाणी नाही. जनावरं पोसायची तरी कशी?*
शेतात शेती वीज पुरवठा बंद असल्यामुळे शेतात असलेल्या जनावरांना आंतरमशागत करताना पाणी पाजायचे असल्यास चक्क विहिरीतून पोहऱ्याने ओढून पाणी काढावे लागते. व जनावरांची तहान भागवावी लागते. त्यामुळे जनावरं घेऊन शेतकरी वर्ग पाण्यासाठी वन वन फिरत आहे.
*विज उपकेंद्राचा कारभार रामभरोसे*
जवळपास एक महिन्यापूर्वी येथील कनिष्ठ विजा अभियंता श्री तायडे यांची बदली झाल्यामुळे येथे कायमस्वरूपी कनिष्ठ विज अभियंता देण्यात आलेला नाही. या वीज उपकेंद्राचा अतिरिक्त कार्यभार उमेश वाणी एरंडोल यांच्याकडे देण्यात आलेला आहे. परंतु तालुक्यावरच जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांना पूर्णवेळ देणे येथे शक्य होत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी कैफियत मांडायची तरी कुणाकडे? यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा संतप्त झालेला आहे.
वीज वितरण कंपनीने तातडीने दखल घेऊन या गावांचा वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
कोट
१) उमेश वाणी, (कनिष्ठ अभियंता )रिंगणगाव वीज उपकेंद्र अतिरिक्त कार्यभार.
येथे वादळामुळे नुकसान मोठे आहे. येत्या दोन ते तीन दिवसात परिसरातील वीज पुरवठा सुरळीत होईल. विजेचे खांब रोवण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
२) श्री रमेश सोमा चौधरी
शेतकरी (रवंजे.)
इतका दिवस शेती वीज पुरवठा बंद असल्याचे आम्ही पहिल्यांदा अनुभवत आहोत. बंद असल्यामुळे कांद्याची लागवड रखडणार हे निश्चित आहे. गुराढोरांना शेतात पाणी नाही. फवारणीला पाणी नाही. त्यामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.