एरंडोल येथील हायवे चौफुली जाहिरातींच्या व अतिक्रमणाच्या विळख्यात…..!

प्रतिनिधी एरंडोल – येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हायवे चौफुलीवर विविध जाहिराती व अतिक्रमणांचा सुळसुळाट झाल्यामुळे या प्रवेशद्वाराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार परिसरात उपहारगृह, विक्रेत्यांच्या हातगाड्या,जड वाहनांची पार्किंग, उपहारगृह व हातगाड्यांसमोर दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग या वाढत्या प्रकारामुळे रस्ता अरुंद झाला आहे . परिणामी वाहतुकीची कोंडी होत असून याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.मार्ग रूंद असूनही वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूकीस अडथळे निर्माण होत आहेत.तसेच याठिकाणी ऑटोरिक्षा सुद्धा दिवसभर पार्किंग केल्या जातात.त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी आहे की वाहने पार्किंगसाठी आहे? असा संतप्त सवाल केला जात आहे.याशिवाय प्रवेशद्वारात व महामार्गाच्या भिंतींवर निरनिराळ्या जाहिरातींचे फलक तसेच भिंतींवर पेंट केलेल्या जाहिराती वाहनचालकांचे लक्ष विचलित करण्यास कारणीभूत ठरत आहेत.तरी सदर बोगदा व प्रवेशद्वार हे वाहतूकीसाठी सुरक्षित,अतिक्रमणमुक्त व जाहिराती मुक्त करावे.अशी जोरदार मागणी आहे.