रिंगणगांव येथे गळा चिरून मुलाचा खून….!

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील रिंगणगांव येथील तेजस गजानन महाजन वय १३ वर्षे या बालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत खून झाल्याचे उघडकीस आले.मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला मृत तेजसच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजसच्या खून प्रकरणी आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही.अशी मागणी तेजसचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाकडे केली.या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर दुपारी जवळपास तासभर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.अतिरीक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी आश्र्वासित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व सायंकाळी तेजसचा मृतदेह कुटुंबीय व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रिंगणगांव येथे अत्यंत शोकपूर्ण वातावरणात तेजसच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमळनेर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते व एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी परिस्थितीवर नियंत्रण केले.शांतता व सुव्यवस्था राखण्यात यश मिळवले.दरम्यान तेजसच्या हत्येमागील नेमके कारण काय याबाबत पोलीस कसोशीने तपास करीत आहेत.काही इसमांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.