एरंडोल ग्रामीण रुग्णालयातर्फे रा. ती. काबरे विद्यालयात आरोग्य जनजागृती शिबिर संपन्न.

प्रतिनिधी एरंडोल – ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांच्या वतीने शहरातील रा. ती. काबरे विद्यालयात किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गुप्तरोग, क्षयरोग (टीबी), एचआयव्ही-एड्स तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या शारीरिक-मानसिक आरोग्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव होते. कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. एस. राठी, समुपदेशक अंकुश थोरात, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस. एस. भांडारकर, पी. आर. जोशी, राष्ट्र विकास संस्थेचे प्रतिनिधी अमोल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात डॉ. दीपक जाधव आणि समुपदेशक अंकुश थोरात यांनी विद्यार्थ्यांना किशोरवयीन अवस्थेत होणारे शारीरिक बदल, मानसिक ताणतणाव, सामाजिक जबाबदाऱ्या, लैंगिक आरोग्य शिक्षण, एचआयव्ही-एड्स यांसारख्या गंभीर विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढावी, तसेच समाजाच्या आरोग्य संवर्धनात प्रत्येकाने भूमिका पार पाडावी, यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
रा.ती काबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. राठी यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आरोग्यदायी सवयींचे महत्त्व पटवून दिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामीण रुग्णालय एरंडोलचे आरोग्य कर्मचारी, काबरा विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस. एस. भांडारकर यांनी आभार मानले.