वृद्धेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.

प्रतिनिधी – एरंडोल येथील गांधीपुरा भागातील जयहिंद चौकातील ५२ वर्षीय महिलेचे हातपाय व तोंड बांधून त्यांच्या अंगावरील सुमारे चाळीस हजार रुपयांचे सोनेचांदीच्या दागिन्यांची लुट केल्याची घटना आज पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी,की गांधीपुरा भागातील जयहिंद चौकातील रहिवासी
उषाबाई भिका बडगुजर (वय-५२) ह्या काल रात्री (ता.५) घराच्या लोखंडी गेटला कुलूप लाऊन झोपल्या होत्या.पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास चार
अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांचे हातपाय दोरीने बांधले तर तोंड रुमालाने बांधून आरोळ्या मारल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यानंतर वृद्धेच्या अंगावर असलेले आठ ग्राम सोन्याचे दागिने,साडेसहा ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व सुमारे १ हजार ५५० रुपये
रोख असा सुमारे चाळीस हजाराचा ऐवज लुटून नेला.सदर वृद्धेचे हातपाय
बांधलेले असल्यामुळे सकाळी त्यांनी स्वत:ची कशीबशी सुटका करून पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.याबाबत उषाबाई बडगुजर यांच्या तक्रारीवरून चार
जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते तसेच फॉरेन्सिक टीमचे पथक दाखल झाले होते.दरम्यान शहरात चो-यांच्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे.वृद्धेच्या घरातून जबरी लुट केल्याप्रकरणी पोलीसस्थानकात गुन्हा
दाखल झाला असतांना देखील पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.जबरी चोरीतील आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.