एरंडोलला मैत्री कॅफे सेंटरवर पोलिसांचा छापा.चालकाविरुद्ध गुन्हा.

प्रतिनिधी एरंडोल-येथील नवीन बसस्थानकासमोर असलेल्या व्यापार संकुलातील मैत्री कॅफे
सेंटरवर बेकायदेशीर कृत्य सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी छापा टाकून चालकाविरुद्ध
गुन्हा दाखल केला.पोलिसांनी छापा घातला त्यावेळी दोन विद्यार्थी व दोन विद्यार्थिनी अश्लील कृत्य करतांना आढळून आले.पोलिसांनी कॅफेवर छापा टाकून चालकाविरोधात गुन्हा दाखल केल्याचे परिसरातील रहिवाशांनी स्वागत
केले आहे.विशेष म्हणजे ग्राहकांनी कॅफे सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर दरवाजा बंद करून कॅफेचालक बाहेरून कुलूप लावत होता असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
नवीन बसस्थानकाच्यासमोर असलेल्या व्यापार संकुलात अनधिकृतपणे कॅफे
सेंटरच्या नावाखाली महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना अश्लील कृत्य करण्यासाठी देत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना मिळाली.निरीक्षक निलेश गायकवाड यांनी महिला पोलीस कर्मचारी यांचेसह दोन कर्मचा-यांना कॅफेवर पाठवून खात्री करण्याचे सांगितले.पोलीस पथकाला कॅफेमध्ये तरुण व तरुणी अश्लील कृत्य करीत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी त्याची माहिती निरीक्षक निलेश गायकवाड यांना दिली.पोलीस निरीक्षक
गायकवाड यांनी महिला पोलीस कर्मचारी वैशाली पाटील,हवालदार किरण पाटील,दीपक पाटील,अनिल पाटील,पंकज पाटील,संदीप पाटील यांचेसह कॅफेवर छापा टाकला.पोलीस पथकाने कॅफेची पाहणी केली असता त्यामध्ये लाकडी पार्टिशन करून ग्राहकांना अश्लील कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे दिसून आले.तसेच कॅफेमध्ये दोन तरुण व दोन तरुणी आढळून आले.कॅफेमध्ये आढळलेले तरुण व तरुणी सज्ञान असल्यामुळे त्याना समज देवून सोडून देण्यात आले.कॅफेचालक रवींद्र दिनकर पाटील रा.जवखेडे ता.एरंडोल याचेकडे परवान्याची चौकशी केली असता त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले.याबाबत हवालदार संजय रामकृष्ण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून कॅफेचालक रवींद्र पाटील याचे विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.कॅफे चालकाकडून तासाकरीता ठराविक रक्कम घेवून अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे समजते.
दरम्यान सदर कॅफेमध्ये अनेक दिवसांपासून गैरप्रकार सुरु असल्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले होते.याठिकाणी कायम महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच आंबट शौकिनांची कायम गर्दी राहत असल्यामुळे महिलावर्गात भीती व्यक्त करण्यात येत होती.पोलिसांनी कॅफेवर छापा टाकून कारवाई केल्याबद्दल नागरिकांमध्ये
समाधान व्यक्त करण्यात येत आहे.