*विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ शिक्षण नव्हे तर सुरक्षा देखील महत्त्वाची – श्री.भागवत पाटील*

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील उत्राण अ.ह. येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा अ.ह., जि.प.उर्दू शाळा आणि माध्यमिक विद्यालय उत्राण अहिर हद्द येथील या तिघ शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांना महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे अपघाती विमा कवच मोफत प्रदान करण्यात आले आहे.
ही उपक्रमशैली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष व एरंडोल पंचायत समितीचे माजी सदस्य श्री.भागवत भिकन पाटील यांच्या सौजन्याने शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था उत्राण यांच्या पुढाकारातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम साकारण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अमोल गोविंदा महाजन आणि संचालक विलास महाजन व प्रकाश कुवर यांनी विशेष प्रयत्न करून विद्यार्थ्यांना संरक्षण कवच मिळवून दिले.
गावातील मान्यवरांच्या हस्ते विमा प्रमाणपत्रांचे औपचारिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागर बियाणी होते. यावेळी सरपंच आनंदा धनगर, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र महाले, डॉ. मगन महाजन, राजू पवार, दत्तू पाटील, प्रकाश कुवर, गणेश चौधरी, अमोल पाटील, सोनू कोळी, लखन लोहारे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापक कैलास साळुंखे, अनिल पाटील,राजू पाटील, राजेश सोनवणे, युवराज वानखेडे, नितीन पाटील, भूषण पाटील व सर्व शिक्षकवृंद पालक आणि ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री.अमोल महाजन यांनी प्रास्ताविक केले तर प्रकाश कुवर व डॉ.मगन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सूत्रसंचालन व आभार श्री.राजेश सोनवणे यांनी मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अपघाती सुरक्षिततेसाठी एक भक्कम आधार मिळाला असून, गावकऱ्यांनी या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. “विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ शिक्षण नव्हे तर सुरक्षा देखील महत्त्वाची आहे,” असा संदेश या कार्यक्रमातून श्री.भागवत पाटील यांनी दिला. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी आणि पालक यांनी सहकार्य केले.