जीव धोक्यात घालून नंदगाव चे विद्यार्थी नाल्याच्या पाण्यातून मार्ग काढत लागतात शाळेच्या दिशेला.

प्रतिनिधी एरंडोल: तालुक्यातील नंदगाव हे अवघ्या एक हजार लोकसंख्येचे गाव असून येथील जवळपास ६० मुले शिक्षणासाठी एरंडोलला जातात. मात्र भालगाव चा तलाव ओसंडून वाहत असल्यामुळे नंदगाव नजीक असलेल्या पद्मावती नाल्याला कमरे इतके पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पाण्यातून रोज मार्ग काढावा लागतो. पाण्याच्या भीतीपोटी काही विद्यार्थी शाळेला दांड्या मारत आहेत तर काही विद्यार्थी आपल्या पालकांची मदत घेऊन नाल्याच्या पाण्यातून एरंडोल च्या रस्त्याला लागतात. नंदगाव नजीक नाल्यावर पूल बांधण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार अमोल पाटील यांना साकडे घातले आहे. तसेच तहसीलदार प्रदीप पाटील यांना देखील भेटून त्यासंदर्भात निवेदन दिले आहे.
एरंडोल ते नंदगाव हा तीन किलोमीटर लांबीचा रस्ता आहे या रस्त्याची पूर्णपणे वाट लागली असून जोरदार पाऊस आल्यास या रस्त्यावर पाच फूट पाणी वाहते. त्यामुळे शाळेत पायी जाणाऱ्या शाळकरी मुला मुलींना रोजचा प्रवास धोकेदायक ठरत आहे. एका बाजूला एरंडोल नंदगाव रस्त्याची दुर्दशा तर दुसऱ्या बाजूला नंदगाव लगत जीव धोक्यात घालून रोजचा प्रवास यामुळे शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम सुद्धा होत आहे. याशिवाय सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे रस्त्यावर पसरल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाले आहे आणि अशा अरुंद रस्त्यावरून विद्यार्थ्यांना रोज पायपीट करावी लागते.
जोरदार पाऊस झाल्यावर नंदगाव ला पाण्याचा दोन्ही दिशांनी वेढा घातला जातो. त्यामुळे नंदगाव चा इतर गावाशी संपर्क तुटतो. अशी तक्रार ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाकडे केली आहे.