अंजनीसह चारही प्रकल्प ओव्हर फ्लो.अंजनी प्रकल्पातून विसर्ग सुरु.

प्रतिनिधी एरंडोल-तालुक्यात झालेल्या पावसामुळे पळासदड येथील अंजनी प्रकल्पासह
भालगाव,खडकेसीम.पद्मालय,चोरटक्की येथील तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे
पाण्याची समस्या दूर झाली आहे.अंजनी प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्के
झाल्यामुळे प्रकल्पातून सुमारे तीनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात
येत आहे.तालुक्यातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकरी
वर्गात देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी प्रकल्पासह चारही लघु
तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे,मात्र पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर
नुकसान झाले आहे.अंजनी प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे प्रकल्पातून सुमारे
तीनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.प्रकल्पातील
विसर्गामुळे अंजनी नदीचे पात्र प्रथमच खळाळून वाहत असल्यामुळे
नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.अंजनी नदीच्या पात्रात
सर्वत्र जलपर्णी वाढल्यामुळे पात्राचे पूर्णपणे विद्रुपीकरण झाले
होते.पालिका प्रशासनासह पाटबंधारे विभागाने पात्राच्या दुरुस्तीकडे
दुर्लक्ष केले होते,मात्र आठ दिवसांपासून अंजनी प्रकल्प ओव्हर फ्लो
झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे निसर्गानेच नदीचे पात्र
स्वच्छ केल्याचे नागरिकांमध्ये उपरोधिकपणे बोलले जात आहे.अंजनी
प्रकल्पातून शहरासह ग्रामीण भागातील सुमारे चौदा गावांना पाणी पुरवठा
करण्यात येतो.सद्यस्थितीत शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत
आहे.तसेच धरणगाव शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास प्रकल्पातूनच
पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत असल्यामुळे धरणगावची समस्या देखील काही
प्रमाणात दूर झाली आहे.तसेच रब्बी पिकांसाठी देखील आवर्तन सोडण्यात येत
असल्यामुळे शेतकरी वर्गात देखील समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.तालुक्यातील अंजनी प्रकल्पासह पद्मालय,खडकेसिम,भालगाव व चोरटक्की
येथील लघु तलाव देखील ओव्हर फ्लो झाल्यामुळे परिसरातील विहिरींच्या
पातळीत देखील लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे रब्बी पिकाच्या क्षेत्रात वाढ
होणार आहे.सतत पडणा-या पावसामुळे ग्रामीण भागाती नाले देखील प्रभावित
झाले असून खळाळून वाहत आहेत.अंजनी प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्के
झाल्यामुळे आमदार अमोल पाटील यांचेहस्ते नुकतेच जलपूजन करण्यात आले
होते.तालुक्यात यावर्षी पावसामुळे सुमारे सात हजार हेक्टरवरील पिकांचे
नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.प्रशासनाने
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले असून शासनाने नुकसानग्रस्त
शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करून दिलासा देण्याची मागणी सर्वत्र केली
जात आहे.