जाजू परिवारातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बक्षीस वितरण सोहळा पडला उत्साहात पार.

प्रतिनिधी – एरंडोल येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल येथे कै. डॉ. जगदीशचंद्र रामनाथ जाजू व कै. सौ. चित्राबाई जगदीश जाजू यांच्या स्मरणार्थ आयोजित बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.डॉ. जगदीश रामनाथ जाजू (जन्म : २० डिसेंबर १९३१, एरंडोल) हे देशातील प्रथितयश प्लास्टिक सर्जन होते. १९५९ साली इंग्लंडमध्ये FRCS हा मानाचा परीक्षापत्रक पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून महेश्वरी समाजातील पहिले डॉक्टर म्हणून त्यांनी इतिहास घडविला. इंग्लंडमध्ये पाच वर्षे उच्च शिक्षण घेतल्यानंतर १९६३ मध्ये भारतात परत येऊन गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थानातील पहिले प्लास्टिक सर्जन म्हणून त्यांनी कार्य सुरू केले. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १९६४ मध्ये स्थापन केलेला प्लास्टिक सर्जरी विभाग देशातील सर्वात मोठा विभाग ठरला. ते भारतातील पहिल्या १५ प्लास्टिक सर्जनपैकी एक होते.कार्यक्रमात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १ ली ते १० वीपर्यंत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना जाजू परिवारातर्फे पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीमुळे पालकवर्गाचे समाधान व्यक्त झाले.
समारंभास शाळेचे मुख्याध्यापक हॅरी जॉन, उपमुख्याध्यापिका सरिता पाटील, शिक्षकवृंद, पालक यांच्यासह शांता जाजू, अनुपम जाजू,प्रियंका जाजू, सूर्यकांत जाजू,कविता जाजू, तसेच क्रीडा शिक्षक व प्रा. मनोज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचलन अनिता तिवारी व उज्वला धनगर यांनी केले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले की, “बक्षिसांच्या स्वरूपात मिळणारा सन्मान हा केवळ विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचा गौरव नसून इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतो. अशा उपक्रमांतून अभ्यासाची आवड आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढते.”
समारंभाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.