एरंडोलला राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे भूलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न
महिलांनी सादर केली भूलाबाईंची गाणी-टिपरी डान्स-सत्कार संपन्न.

प्रतिनिधी एरंडोल – येथील राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे भूलाबाई महोत्सव उत्साह, आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी भूलाबाईंची गाणी, टिपरी (फेर धरून) सादर केली. तसेच विशेष उल्लेखनिय कार्य केलेल्या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला.
सरस्वती कॉलनीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या तथा ज्येष्ठ समाजसेविका शशिकला जगताप होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेविका शोभा साळी आणि मीना मानुधने होत्या. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पुजनाने मान्यवर महिलांचे हस्ते करण्यात आले.
सदरप्रसंगी मंडळ सदस्या सौ. सुरेखा दिलीप सावंत यांनी छोट्याशा गृहउद्योगातून (शिवणकाम आदी) आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षीत केले तसेच श्रीमती वंदना मधुकर पाटील (मंडळ सचिव) यांना कार्यालयात पदोन्नती-प्रमोशन मिळाल्याने दोन्ही महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. सावंत आणि श्रीमती पाटील यांनी आपल्या मनोगतात खडतर जीवन प्रवासाची, आलेल्या अडचणी-अडथळे यांची माहिती दिल्याने गहिवरून आले.
प्रमुख अतिथी सौ. शोभा साळी आणि श्रीमती मीना मानुधने यांनी भूलाबाईं (प्राचीन काळ) बाबत महिलांचे संगठन, सक्षमीकरण बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनिषा पाटील यांनी, प्रास्ताविक सौ. शकुंतला अहिरराव यांनी तर आभार प्रदर्शन वंदना पाटील यांनी केले.
राजमाता जिजाऊ मंडळ अध्यक्षा तथा माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी मंडळाची वाटचाल, विविध कार्यक्रम, महिला संघटनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात महिलांनी टिपरी खेळ (फेर धरून) सादर केला. खिरापत-खाऊ ओळखणे खेळ खेळून आनंद लुटला. यावेळी इंदिरा पाटील, सुलोचना पाटील, सुरेखा पाटील, पुष्पा पाटील, शकुंतला देवरे, मनिषा पाटील यांचेसह माधूरी भवार, वैशाली पाटील, विद्या देवरे, अश्विनी पाटील, शहनवाज तडवी, तसलीम तडवी, अनिता चव्हाण, सौ. लता मराठे, वैशाली मराठे यांनी परिश्रम घेतले. शेवटी भूलाबाईची आरती होवून स्वादीष्ट जेवणाचा आस्वाद घेवून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी मंडळाच्या सदस्या यांचेसह महिलांची मोठी उपस्थिती होती.