अवैधरित्या सुरु असलेल्या गौण खनिज उपसा थांबविण्यासाठी मनसेने दिले निवेदन.

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील अवैधरित्या सुरु असलेल्या गौण खनिज उपसा (वाळू, मुरुम) हे तात्काळ ८ दिवसाचे आत थांबवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदन एरंडोल मनसे तर्फे तहसीलदार प्रदिप पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात एरंडोल तालुक्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात गौण खनिज व अवैध वाळू उपसा सुरु असून त्यांची सर्रासपणे विक्री होत आहे. सदरील अवैध वाळू ही उत्राण, हनुमंत खेडे, म्हसावद, नागदुली, रवंजे, सुकेश्वर, कढौली, वैजनाथ, टाकरखेडा, भातखेडे इ. गावातून मोठ्या प्रमाणात गिरणा नदीच्या पात्रातून अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या मार्फत काढण्यात येत असून त्यामुळे या पात्रातील नदीचे पात्र हे खोल गेलेले आहे.
नदीपात्रात भरपूर पाणी जमा असल्याने वाळू माफीया यांना नदीपात्रातून वाळू उपसा करणे शक्यच होत नाही. त्यामुळे संबंधित वाळू माफिया यांनी शक्कल लढविलेली असून सदरील वाळू माफिया हे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या सहाय्याने रात्रीच्या सुमारास साधारणत रात्री ८.०० ते सकाळी ५.०० या वेळेमध्ये बेसुमारपणे वाळूचे उपसा करुन त्याची मोठ्या डंम्परने ते रातोरात वाहतूक करुन विल्हेवाट लावीत असून असा हा गैरप्रकार वाळू माफिया हे संबंधित विभागाचे अधिकारी
वर्ग, तलाठी, मंडळाधिकारी, तहसिलदार, प्रांत, प्रांताधिकारी या सर्वांना हाताशी धरुन राजेरोसपणे करीत असल्याचे म्हटले असून तहसीलदार यांना वरील दोन्ही ठिकाणी तात्काळ महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे पथक रात्र-दिवस बंदोबस्तासाठी थांबविण्यात यावे जेणेकरुन होत असलेला वाळू उपसाला आळा बसेल व अवैधरित्या होत असलेल्या वाळू उपसामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे विहीरीच्या पाण्याची पातळी खूपच खाली गेलेली असून अशीच परिस्थीती जर अजून १ ते २ वर्ष राहिली तर भविष्यात सर्व शेतकरी बांधवांना त्यांचे पिकांसाठी पाणीच विहीरींमध्ये राहणार नसल्याचे म्हटले आहे तसेच उत्राण, हनुमंत खेडे, म्हसावद, नागदुली, रवंजे, सुकेश्वर, कढोली, वैजनाथ, टाकरखेडा, भातखेडे या गावांना पिण्याचे पाणी येथून पुरविले जाते. सध्या प्रधानमंत्री जलमिशन योजना अंतर्गत त्याठिकाणाहून वरील गावांना पाणी पुरविणेबाबतचे काम सुरु आहे. परंतु त्याठिकाणाहूनच वाळू माफिया हे मोठ्या प्रमाणात वाळूची उचल करीत असल्याने तेथे पाण्याचा साठाच शिल्लक राहणार नाही, तरी संबंधित गावांना पाणी कसे पुरविले जाईल ? हा मोठा गंभीर प्रश्न असल्याचे म्हटले आहे तसेच या अवैधरित्या मोठ्या डंम्परने होत असलेल्या वाळू वाहतुक मुळे शेतरस्त्याचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना बैलगाडीचा रस्ता हा खूपच त्रासदायक झालेला आहे. या वाहतूकीमुळे भविष्यात याठिकाणी एखाद्या वेळी मोठी जिवीतहानी होण्याची घटना घडण्याची दाट शक्यता आहे. उत्राण, हनुमंत खेडे, म्हसावद, नागदुली, रवंजे, सुकेश्वर, कढोली, वैजनाथ, टाकरखेडा, भातखेडे गावावरुन जाणारे शाळेकरी विद्यार्थी सायकलीने वापरीत असतात व याच रस्त्यावर वाळू वाहतूक करणारे डंम्पर, हायवा डंम्पर, ट्रॅक्टर या वाहनांतून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात असल्याने ते वाहने जोराने चालतात व रस्त्यावर सायकलीने शाळकरी विद्यार्थी वापरत असल्याने एखाद्या वेळेस शाळकरी विद्यार्थ्यांचा या वाहनाद्वारे अपघात होण्याची देखील दाट शक्यता निर्माण देखील असल्याचे म्हटले आहे.
संबंधित अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गाड्यावर कुठल्याही प्रकारे नंबर प्लेट नसतात. त्यामुळे संबंधित लोक हे मोठ्या प्रमाणात जोराने आपली वाहने रस्त्यावरुन ने-आण करीत असतात तसेच अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाल्यावर देखील संबंधिता विरुध्द काही एक कारवाई केली जात नाही. कारण या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे वर पर्यंत हात असल्याचे ते बोलून दाखवित असतात. तसेच संबंधितांचे वाहन वगैरे जर एखाद्या वेळी अडविण्यात आले तर संबंधितावर सदरील महसूल विभागाचे कर्मचारी हे थातूर-मातूर प्रमाणात कारवाई करुन पंचनामा करुन सदरील वाहने सोडून देत असतात.यामुळे यांची मोठ्या प्रमाणावर मुजोरी व दहशत वाढलेली असल्याचे म्हटले असून संबंधित अवैधरित्या वाळू उपसा व गौण खनिज यांचेवर तात्काळ ८ दिवसाचे आत योग्य ती कारवाई होऊन सदरील अवैधरित्या होत असलेली वाळू वाहतूक थांबविण्यात न आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठ (८) दिवसानंतर शेतकरी, स्थानिक नागरीक व शाळकरी विद्यार्थी यांना सोबत घेऊन तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडणार असून यादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी महसूल प्रशासनास जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल सोनार, सहकार सेनेचे जिल्हा संघटक ज्ञानू पाटील, जगदीश सुतार,तालुका उपाध्यक्ष निंबा पाटील, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष संदीप राठोड उपस्थित होते.