*व्यंगचित्रकार व सुलेखनकार शरद महाजन अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित…..!*

प्रतिनिधी एरंडोल – माझी शाळा माझा फळा समुह आयोजित ४ थे राज्यस्तरीय अक्षर संमेलन दिनकर सभागृह,बारामती येथे २३ मे ते २५ मे २०२५ दरम्यान पार पडले.सोहळा अक्षरांचा सन्मान कलाकारांचा अंतर्गत एरंडोल येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार, सुलेखनकार व पत्रकार शरद महाजन यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, सुनंदाताई पवार ,संमेलन स्वागताध्यक्षा तथा विश्वस्त ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, बारामती,सुप्रसिद्ध सुलेखनकार व रांगोळीकार संमेलनाचे संयोजक अमित भोरखडे,प्रशांत साजणीकर संमेलनाध्यक्ष तथा संचालक महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या हस्ते व्यंगचित्रकार व सुलेखनकार शरद महाजन यांना सन्मानपत्र, ट्रॉफी, पुष्पगुच्छ, मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.या अक्षरसंमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास ४०० पेक्षा अधिक सुलेखनकार, रांगोळीकार व चित्रकार सहभागी झाले होते.
माझी शाळा माझा फळा या ग्रुपचे प्रमुख अमित भोरकडे सर यांनी सर्व सुलेखनकारांना एका व्यासपीठावर एकत्र आणून ही अक्षर चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवली.आज या ग्रुपमध्ये हजारो चित्रकार, रांगोळीकार व सुलेखनकार जोडले गेले कारण या ग्रुपचे ब्रीदवाक्य आहे अक्षरांची गोडी माणसे जोडी.अमित भोरकडे सरांनी या अक्षर दिंडीची सुरूवात पंढरपूर पासून केली.तिसरे संमेलन कोल्हापूर येथे झाले.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक तळागाळातील कलाकारांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी व मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी हे संमेलन महत्वपूर्ण ठरले आहे.राज्यभरात ओळख निर्माण केलेल्या ३० गुणी कलावंतांना या संमेलनात अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.विशेष म्हणजे यात ५ बाल सुलेखनकारांना देखील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.एरंडोल येथील व्यंगचित्रकार व सुलेखनकार शरद महाजन यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने एरंडोलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
संमेलनाचा समारोप व पुरस्कार वितरण प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार रोहीत पवार यांनी ” अक्षर संमेलनाची ही चळवळ मराठी भाषेचा सन्मान वाढविण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण कार्य असून भविष्यात सुलेखनकारांचे व कलावंतांचे मोठे संमेलन भरविण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू.” असे प्रतिपादन केले.
या तीन दिवशीय अक्षर संमेलनात अनेक दिग्गज कलावंतांनी पेपर कॅलिग्राफी, मातीकाम, स्प्रे गण पेंटिंग, पिंपळ पानावरील व्यक्तिचित्र, दोन्ही हाताने लेखन या कलांचे अक्षर संमेलनामध्ये सुंदर सादरीकरण करण्यात आले.सुलेखना बरोबरच निसर्गचित्र,कॅरीकेचर,फेस पेंटिग, छत्री वरील पेंटिंग व सुलेखन आपल्या हस्ताक्षरात लिहून सुलेखनकारांनी मनमुराद आनंद लुटला.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध सुलेखनकार व अक्षरगुरू पद्मश्री अच्युत पालव यांनी आपला पद्मश्री पर्यंतचा प्रवास नवतरूण सुलेखनकारांसमोर मांडून प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले.तसेच काही दिग्गज फलकलेखनकारांनी सुंदर अप्रतिम फलकलेखन करून कौतुकाची थाप मिळवली.
दुसऱ्या दिवशी सुलेखनकार व रांगोळीकार मित्रांनी पेपर कॅलिग्राफी,छत्री वरील पेंटिंग व व्यक्तीचित्र रांगोळी काढून नवकलाकारांना मार्गदर्शन करीत सुंदर कलाकृती सादर केल्या.सर्व कलाकारांनी या सर्व कलांचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला.तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध सुलेखनकार व मोडी लिपी तज्ञ डॉ.तेजस लोखंडे यांनी सर्व सुलेखनकारांना मोडी लिपी शिकण्यासाठी मार्गदर्शन व आवाहन केले.
संमेलनाचे सुत्रसंचलन दिपक इरकल यांनी केले.तर प्रास्ताविक संयोजक अमित भोरखडे यांनी केले.हे अक्षर संमेलन यशस्वी करण्यासाठी मुख्य नियोजक प्रशांत वाघमारे,ज्ञानेश्वर विजागत, पल्लवी पवार, सोनल भोरकडे,प्रमोद देठे,रोहित जाधव, भारत काळे, महेंद्र दीक्षित, अतुल गायकवाड, सिद्धार्थ कांबळे, रमेश मल्लाव, कल्याणी जरांडे, विकास जाधव, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर बारामतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.