गरीब रुग्णसेवेबद्दल जाकीर पिंजारी ‘आरोग्य मित्र’ सन्मानाने गौरवले.

विशेष प्रतिनिधी- पारोळा तालुक्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी गेल्या दहा वर्षांपासून झटणारे समाजसेवक जाकीर उस्मान पिंजारी यांना आरोग्य विभागाच्या वतीने ‘आरोग्य मित्र’ या सन्मानाने गौरवण्यात आले. त्यांच्या निरपेक्ष सेवाभावी कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून, संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पिंजारी गेल्या दशकभरापासून तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शासकीय आरोग्य योजना, कुटीर रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत सेवा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करतात. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांतूनही ते जनतेत आरोग्य जनजागृती घडवतात.
स्वर्गरथ उपक्रमासाठी त्यांनी लोकसहभागातून दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे. तसेच आयुर्वेदिक औषधांच्या फायद्यांबाबत जनतेला मार्गदर्शन करत त्यांनी अनेक गरजू रुग्णांना मोफत आणि योग्य उपचार मिळवून दिले आहेत.
या सेवाभावी कार्याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजारी यांना ‘आरोग्य मित्र’ पुरस्कार देण्यात आला.
हा सन्मान समारंभ ६ ऑक्टोबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पारोळा येथे पार पडला. यावेळी डॉ. योगेंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. योगेश पाटील, महेश सेंदाने, भूषण पाटील, भाग्यश्री देसले, दीपाश्री पाटील, श्री. वाणी यांसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारोळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी पिंजारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.