शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांची खुर्ची जप्त;

प्रतिनिधी जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (रामप्रा) चे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्या कार्यालयात आज प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुर्ची, संगणक असे साहित्य जप्त करून नेले. यापूर्वी कलेक्टर, मनपा आयुक्त, तहसीलदार यांच्या खुर्च्या जप्तीचे ऐकले आहे. मात्र केंद्रात रस्ते – महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील रामप्रा वर अशी वेळ संपूर्ण भारतात कुठेही आलेली नाही. जळगावात मात्र ती नामुष्की ओढवली गेली.
मोंढाळे प्रगणे सबगव्हाण (ता. पारोळा) येथील प्रतिभा सतीश मोराणकर, नरेश हुडाराज उर्फ हंडोमल नागदेव, दीपक उर्फ बिंदूमाधव अवधूत कुळकर्णी आणि राजीव मोहनलाल अग्रवाल यांची शेतजमीन रामप्राच्या रस्ते कामासाठी २०१३ मध्ये अधिग्रहीत झाली आहे. मात्र शेतजमिनीचा वाढीव मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याबाबत जिल्हाधिकारी व कनिष्ट दिवाणी न्यायालय जळगाव येथे शेतकऱ्यांच्या याचिकांवर सुनावणी होऊन शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा असे आदेश यापूर्वी दिले आहेत. मात्र रामप्राने त्यावर कार्यवाही केली नाही.
अखेर प्रतिभा सतीश मोराणकर यांनी ३० लाख ७० हजार रूपये, नरेश हुडाराज उर्फ हंडोमल नागदेव यांनी ५१ लाख ४७ हजार रूपये, दीपक कुळकर्णी यांनी ६७ लाख ५७ हजार आणि राजीव अग्रवाल यांनी ६४ लाख ५९ हजार रूपये वसुलीच्या बदल्यात रामप्राच्या प्रकल्प संचालक कार्यालयातील साहित्य जप्तीचे न्यायालयाचे आदेश आज बजावले. न्यायालयाने दिलेला आदेश घेऊन बेलिफ व पंचांनी रामप्रा प्रकल्प संचालक कार्यालय गाठले. तेथे प्रकल्प संचालक शिवाजी पवार होते. प्रकरण उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर सादर आहे असा बचाव केला. मात्र शेतकऱ्यांतर्फे ॲड ओम त्रिवेदी, ॲड. सुनील माळी व ॲड. तुषार पाटील यांनी जप्तीची कार्यवाही पूर्ण करण्याचा आग्रह धरला. अखेर श्री. पवार ज्या खुर्चीवर बसतात ती खुर्ची, एक संगणक, दोन माॅनिटर, एक स्टीलची खुर्ची असा ऐवज जप्त करण्यात आला. रामप्राबाबत अशी कार्यवाही पहिल्यांदा घडली. जवळपास दोन – अडिच कोटी रूपये घेणे असताना केवळ २३ हजार रूपयांचा माल जप्त केला गेला. अर्थात यामुळे रामप्रावर नामुष्की ओढवली गेली.