८० फुटी डीपी रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्याने रस्त्याने घेतला मोकळा श्वास .

प्रतिनिधी अमळनेर : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या ८० फुटी डीपी रस्त्यावरील ७० अतिक्रमण नगरपरिषदेने हटवल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
आमदार अनिल पाटील यांनी सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी शहराबाहेरील डीपी रस्त्यासाठी मंजूर केले आहेत. मुंदडा नगर तसेच काही भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने रस्ता तयार करण्यास अडचणी येत होत्या. अनेक लोकांनी घरे ,कंपाउंड , पक्के बांधकाम , बगीचा ,झाडे लावून ठेवल्याने रस्त्याचे काम करता येत नव्हते. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी कठोर भूमिका घेत तीन जेसीबी मशीन , कामगार व अधिकाऱ्यांचा ताफा नेत सुमारे ७० अतिक्रमण तोडले आहेत. या भागातील काही लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच शहर विकासासाठी अतिक्रमण काढणे आवश्यक असल्याचे समजावत अडथळा ठरणारे सर्व अतिक्रमण काढण्यात आले.
अतिक्रमण काढण्यासाठी बांधकाम विभाग अभियंता डिगंबर वाघ , सुनील पाटील , अजित लांडे , मयूर तोंडे , प्रवीण पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल , आरोग्य विभाग व अतिक्रमण विभाग कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.