प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व – अब्राहम आढाव.

प्रतिनिधी पुणे: रविवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सेक्रेड हार्ट चर्च, येरवडा, पुणे येथे एक दिवसीय माहिती अधिकार कार्यशाळा आणि चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कॅथोलिक असोसिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेसाठी ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे चे संस्थापक अब्राहम आढाव यांना प्रमुख प्रशिक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यशाळेला पुणे धर्मप्रांतातील विविध भागांमधून अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि चर्च सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात झेवियर डिसिल्वा(खजिनदार )यांनी प्रशिक्षकांचा अल्प परिचय करून देऊन केली. त्यानंतर अब्राहम आढाव यांनी उपस्थित नागरिकांना माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व आणि त्याचा उपयोग स्पष्टपणे समजावून सांगितला.
आढाव यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, शासनाचा कारभार जनतेच्या करातून चालतो आणि त्यामुळे जनतेचा सहभाग हा शासन व्यवस्थेत अनिवार्य आहे. शासकीय यंत्रणेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने माहिती अधिकार कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या तिजोरीतून खर्च होणाऱ्या निधीतून मोठमोठी विकासकामे केली जातात, त्यामुळे हा निधी योग्य प्रकारे वापरला जात आहे का हे पाहण्याची जबाबदारीही नागरिकांची आहे.
माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीचा कणा आहे. हा कायदा नागरिकांना शासनाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती मिळवण्याचा हक्क प्रदान करतो. या माध्यमातून प्रशासनात पारदर्शकता निर्माण होते, भ्रष्टाचाराला आळा बसतो आणि लोकशाही अधिक बळकट होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने माहिती अधिकार कायद्याचे सखोल ज्ञान घेऊन त्याचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार टाळण्यासाठी आणि जनहिताची कामे पार पाडण्यासाठी माहिती अधिकार कायदा एक प्रभावी साधन आहे. प्रत्येक नागरिकाने हा कायदा शिकून प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे आढाव यांनी ठामपणे सांगितले. “आजही जनता हीच खरी राजा आहे आणि या राजाने जागरूक होणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.
कार्यशाळेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. जयप्रकाश पारखे यांनी सर्वांचे आभार मानले तर मरिया उलाल (कॅप सेक्रेटरी) यांनी प्रशिक्षकांचा सत्कार केला. यावेळी ज्यो. कसबे सर यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने पुढील प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे जिल्हा कॅप टीमसह शिवा तांबे, प्रमोद पारधे, संजय तांबे, सतीश तोरणे हरी मिरिंडा, झेवियर डिसिल्वा, विलियम आणि इतर सदस्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.