अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन देयके वेळेवर होणे बाबत दिले निवेदन.

वेतन वेळेवर न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यासह शाळा भरवून आंदोलन केले जाणार असल्याचा दिला इशारा.
प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील 20% 40% 60% वेतन अनुदानावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचे वेतन गेल्या काही महिन्यापासून वेळेवर होत नाही आहे, त्यामुळे आधीच तुटपुंजा पगार व त्यातही वेतन वेळेवर होत नसल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची प्रपंच चालवत असताना कमालीची अडचण निर्माण झाली आहे.अनेक शिक्षकांच्या कुटुंबामध्ये औषध उपचारासाठी पैशांची गरज आहे तर अनेकांची बँक ईएमआय देखील थकली आहेत.हात उसणवारी व व्याजाचे पैसे घेऊन घर खर्च भागवला जात असल्याने शिक्षक वर्ग कमालीचा नाराज झाला आहे. याबाबत सातत्याने वेतन अधीक्षक व कोषागार कार्यालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर वरच्या स्तरावरून निधी कमी मिळणे, निधीचा तुटवडा, कार्यालयातील स्टाफ कमी असणे अशी उत्तरे मिळतात.
यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे,आमदार किशोर दराडे यांच्याकडे अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वेतना संदर्भाच्या अडचणी देखील कळविण्यात आल्या होत्या. यावेळी संबंधित कार्यालयाकडून बीडीएस जनरेट करण्यात आले आहे, दोन दिवसात पगार होतील असे उत्तर आमदार सत्यजित तांबे साहेब यांना दिले होते. आता यास पंधरा दिवसापेक्षा जास्तीचा कालावधी लोटला तरी शिक्षकांचे वेतन झालेले नाहीत.अंशतः अनुदानित शिक्षकांची वेतन नियमित वेळेवर झालेली नाहीत.सदर बाब लक्षात आणून देण्यासाठी शिक्षक समन्वय संघाकडून वारंवार विनंती करूनही वेतन देयके विलंबित झाली आहे. यामुळे आपल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. पगार देयके नियमित करण्यासाठी आणि ती वेळेवर केले जातील याची खात्री करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडून त्वरित कार्यवाही करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान उच्च माध्यमिक 20% 40% चे वेतन नोव्हेंबर पेड इन डिसेंबर,माध्यमिक शाळा 20 टक्के 40 टक्के 60 टक्के नोव्हेंबर पेड इन डिसेंबर थकीत आहे, वेतन 20% जुलै 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत. (उच्च माध्यमिक) या विभागांची वेतन विलंबित आहेत.
शेवटी जर सदर कार्यालय थकीत रकमेच्या देयकासाठी टाईम लाईन देऊ शकत असेल तर आम्ही याचे कौतुक करू व अजून आठवडाभर प्रतीक्षा करू मात्र आठवडाभरात प्रश्न नाही मिटवला तर आपल्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यासह शाळा भरवून आंदोलन केले जाईल असा इशारा संघातर्फे देण्यात आला आहे.
याप्रसंगी संदीप बाविस्कर,रवी पवार,अनिल परदेशी ,मुकुंद आढाव, विजय ठोसर,आझर शेख गौरव कोळी, सुनिल देशमुख,सुधीर शिरसाट, कादरी सर,राहुल निकम,विलास काळे आदी शिक्षक उपस्थित होते.