आम्हा विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे

माजी विद्यार्थी तर्फे सरांना भावसुमानंजली
एरंडोल – काल दि.११एप्रिल २०२५ रोजी सरांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं वृत्त आज माझे मित्र व स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांचे विद्यार्थी असिस्टंट कमिशनर सुधाकर निकम यांनी फोनद्वारे ही दुःखद बातमी दिली. आदरणीय गुरुवर्य स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना मागील पंचेचाळीस वर्षे मनात दाटीवाटीनं उभी राहिलित.अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या माझ्या गुरूंनी मला ,मी एफ. वाय. बी. ए.च्या वर्गात प्रवेशित असतांना एन.एस.एस.च्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिलं. सूत्र संचलन,प्रास्ताविक,आभार या छोट्या छोट्या प्रसंगांमधून सभाधारिष्ट्याचे धडे जे गिरवले.त्याचा फार मोठा फायदा मला महाविद्यालयीन अध्ययन काळात झाला.मी बारावी पर्यंत बुजरा विद्यार्थी म्हणूनच वावरलो.पण सर भेटलेत आणि एन एस एस च्या जोडीने वाङ्मय मंडळ,कला मंडळ,स्नेह संमेलन,युथ फेस्टिव्हल ही दमदार व्यासपीठं एकामागून एक गवसत गेली.अर्थात सरांच्याच प्रेरणेने व मार्गदर्शनाने. फिजिकल डायरेक्टर या पोस्टच्या पलीकडे असलेल्या माझ्या गुरूंनी माझ्यासारखे किती तरी विद्यार्थी घडविले.विद्यार्थ्यांची ती यादी खूप मोठी होईल.शिक्षक, प्राध्यापक,प्राचार्य व किती तरी सरकारी व सहकार क्षेत्रात कार्यरत राहून निवृत्त झालेतही. माझ्यावर व माझ्यातल्या कविवर त्यांचं निस्सिम प्रेम होतं. *तुझी कविता तुला श्रीमंत करेल* हे वाक्य ते नेहमी उच्चारत असत.त्यांचे बोल आणि त्यांची आशिर्वचनं मला ठायीठायी कामी आलीत.२०२४ या वर्षी अखिल भारतीय जेष्ठ नागरिक संघाचे पुणे येथे अधिवेशन संपन्न झाले.त्या अधिवेशनात संपूर्ण भारतातून जेष्ठ संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थिती दिली होती.आदरणीय भदाणे सर हे संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे अधिवेशनात मी बोलावं या दृष्टीने मला फोनवरून आदेशच काढला....मी समारंभास येतो पण बोलणार नाही.असे बोलल्या बरोबर....तुला बोलावं लागेल.आणि तेही हिंदी किंवा इंग्रजीभाषेतून....नाही म्हणू शकलो नाही.आणि उभ्या आयुष्यात हिंदीतून तीस मिनिटं मी बोलून गेलो....पुण्यातील स्वारगेट तेथील गणेश कला मंदिर खच्चून भरलेले सभागृह आणि माझं तीस मिनिटांचं बोलणं संपल्याबरोबर व्यासपीठावर सरांचं येणं आणि मला छातीशी धरून माईकवर माझ्यावर केलेलं कौतुकाचं भाष्य ऐकून आपलं या समारंभाला येणं सार्थकी लागल्याचं मनस्वी समाधान झालं.त्यांनी आयुष्यभर आव्हानं पेललीत.आणि आम्हा विद्यार्थ्यांनाही आव्हानं पेलण्यासाठी बळ दिलं. त्यांच्यात असलेली नेतृत्वाची कर्तृत्वाची संपदा पाहता त्यांच्या वाट्यात निंदाही आली. पण त्याकडे त्यांनी कधीच पाहिलं नाही. *चणे खावे लोखंडाचे।तेथ ब्रम्हपदी नाचे* ,या उक्तीचं सारतत्व त्यांच्या कृतीत सदैवं राहिलं. त्यांनी नोकरी करत असतांना आणि निवृत्तीनंतरही आपल्या महाविद्यालयाचा *अन्नपूर्णा* म्हणूनच गौरवोल्लेख केला.सरांच्या सहवासातल्या किती तरी आठवणी सांगता येतील.मी प्राध्यापक झालो त्यापाठी माझे गुरू आणि त्यांचे आशीर्वादच कामी आले.सर एफ.वाय. बी.ए.मध्ये भेटले नसते तर बारावी पर्यंत असलेलं माझं बुजरेपण पुढे नियमित राहिलं असतं. मग कविताही नसत्या आणि मी प्राध्यापकही झालो नसतो.
लाघवी काही फुलांची ,लोचने होतील ओली.
दूरच्या येतील हाका, सर परतून पुन्हा याल का हो.
….ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो….
हीच भावसुमानंजली
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐