श्रीक्षेत्र पद्मालय येथील विकासकामांची आमदार अमोल पाटील यांचेकडून पाहणी.

एरंडोल-धार्मिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या तसेच तालुक्याची देशभरात वेगळी ओळख निर्माण करणा-या श्रीक्षेत्र पद्मालय (ता.एरंडोल) येथे सुमारे तेवीस
कोटी रुपये खर्च करून सुरु असलेल्या विविध विकासकामांची आमदार अमोल पाटील
व पदाधिका-यांनी पाहणी केली.विकासकामांबाबत कोणतीही तडजोड न करता सर्व कामे लवकर पूर्ण करण्याच्या सुचना आमदार अमोल पाटील यांनी ठेकेदारांना
केल्या.
देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पद्मालयची विकासापासून वंचित असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.मंदिर परिसरात सर्वत्र घनदाट जंगल असल्यामुळे भाविकांना
पुरेशा प्रमाणावर सोयी व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने माजी आमदारचिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमोल पाटील यांनी निधी उपलब्ध व्हावा शासनाच्या वनविभाग व पर्यटन विभागाकडे पाठपुरावा केला
होता.माजी आमदार चिमणराव पाटील व आमदार अमोल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे श्रीक्षेत्र पद्मालय येथील विविध विकासकामांसाठी वनविभागातर्फे वनपर्यटन अंतर्गत सुमारे दहा कोटी रुपये तर पर्यटन विभागातर्फे तेरा कोटी असा सुमारे तेवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला
असून विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे.मंजूर झालेल्या निधी अंतर्गत सुमारे दहा एकर क्षेत्रावर गणराया उद्यानाची निर्मिती करण्यात येणार असून
अडीच एकर क्षेत्रावरील विविध उद्यानांच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. तसेच मंदिराच्या समोरील बाजूस पर्यटन विभागातर्फे सुमारे तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून याठिकाणी
स्वच्छतागृह,सभागृह,रस्त्यावर पेव्हर ब्लॉक यासह विविध कामे वेगाने सुरु आहेत.आमदार अमोल पाटील यांनी पद्मालय येथे सुरु असलेल्या विकासकामांच्या
बांधकामाची पाहणी करून कामांच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सुचना ठेकेदारांना केल्या.यावेळी आमदार अमोल पाटील यांनी सुरु असलेल्या सर्व कामांची माहिती वनविभागाचे अधिकारी व ठेकेदार यांचेकडून जाणून घेतली.
पद्मालय येथे सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे परिसराच्या सौदर्यात भर पडणार असून भाविकांना विविध प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध होणार आहेत.पद्मालय येथील विकासकामांमुळे भाविकांच्या संख्येत वाढ होणार
आहे.विकासकामांमुळे भाविकांना देवदर्शनासह पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.श्रीक्षेत्र पद्मालय येथे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी असून मंदिराचे बांधकाम पूर्णपणे हेमाडपंथी करण्यात आले आहे.मंदिरासमोरच असलेल्या तलावातील विविध रंगाची कमळाची फुले भाविकांना आकर्षित करीत असतात.तसेच मंदिराच्या चारही बाजूस घनदाट अरण्य असून याठिकाणी जंगली जनावरांची संख्या लक्षणीय आहे.मंदिर परिसरातच मोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मंदिराच्या सौदर्यात मोठी भर पडत असते.माजी आमदार
चिमणराव पाटील,आमदार अमोल पाटील यांनी भाविकांची होणार गैरसोय लक्षात घेवून शासनाकडे पाठपुरावा करून पद्मालय येथील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणल्याबद्दल भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
*कोट*
श्रीक्षेत्र पद्मालयच्या विकासासाठी कटिबद्ध.-आमदार अमोल पाटील.-
श्रीक्षेत्र पद्मालय देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध आहे.आगामी काळात संपूर्ण पद्मालयचा विकासकामांच्या माध्यमातून कायापालट
करून श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थान सुंदर पर्यटनस्थळ करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल..