सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास.

प्रतिनिधी – एरंडोल येथील विवाहितेने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून एरंडोल पोलिस स्टेशनला पतीसह सासू, जेठ व जेठाणी यांच्या विरोधात विवाहितेच्या भावाने तक्रार दाखल केली आहे.
माहिती अशी की काल दि.४ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पाल्लीवाळ परिवार जेवण करून बसले असता मनिषा वरच्या मजल्यावर असल्याने मुलगा शर्विल हा त्यांना जेवणासाठी बोलावयास गेला.मात्र घराचा दरवाजा बंद असल्याने गणेश पल्लीवाळ व त्यांचा चुलत भाऊ हेमंत सोनार यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा न तुटल्याने त्यांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला असता त्यांना मनिषाने गळफास घेतल्याचे आढळून आले.त्यांनी तातडीने मनिषाला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मयत झाली असल्याचे सांगितले.
याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला मनीषाचे भाऊ मनोज पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत् असे की एरंडोल येथील जे.डी.सी.सी. बँके जवळ राहणाऱ्या सागर श्यामकांत पल्लीवाळ यांच्या सोबत २०१४ साली शिरपूर येथील मनीषाचा विवाह झाला होता.सागर हा पुणे येथे नोकरीस असल्याने ती सुद्धा त्याच्या सोबत पुणे येथे राहत होती यादरम्यान त्यांना शर्विल नामक पुत्र झाला परंतु कोरोना नंतर ते परत एरंडोल येथे आले.यावेळी मात्र मनीषा एरंडोल येथे राहत होती व पती सागर पुणे येथे राहत होता.दरम्यान मनिषा एरंडोल येथे सासू ,सासरे, जेठ,जेठाणी यांच्या सोबत राहत होती.लग्नाच्या चार वर्षानंतर पती सागर पल्लीवाळ, सासू मंगला पल्लीवाळ, जेठ गणेश पल्लीवाळ व जेठाणी सुषमा पल्लीवाळ हे मनीषाच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करीत असत.यादरम्यान मनिषा आपल्या भावाला व आई वडिलांना फोन करुन सदर बाब लक्षात आणून देत असे.यासाठी जवळपास तीन वेळेस मनीषाचे आई वडील,भाऊ,लग्न जमविणारे सागरचे मामा नितीन मुंडके यांनी सागर यास समज दिली होती.बहिणीचा संसार तुटेल या कारणाने त्यावेळेस कुठलीही तक्रार तिच्या घरच्यांनी केली नव्हती.परंतु दि.४ जून रोजी रात्री मनीषा सागर पाल्लीवाळ हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला असल्याचे मनीषाच्या आई वडील व भावांना कळल्यावर लागलीच त्यांनी एरंडोल गाठले एरंडोल येथे ग्रामीण रुग्णालयात मनीषाचा मृतदेह बघून सर्वांनी एकच टाहो फोडला व तत्काळ एरंडोल पोलिस स्टेशनला तिचा पती सागर पल्लीवाळ, सासू मंगला पल्लीवाळ, जेठ गणेश पल्लीवाळ व जेठाणी सुषमा पल्लीवाळ यांच्या विरोधात मनीषाचा भाऊ मनोज पोतदार यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पती सागर व जेठ गणेश यास ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.