काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय पंढरीनाथ महाजन यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

प्रतिनिधी एरंडोल- येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश प्रतिनिधी विजय पंढरीनाथ महाजन यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व पदाचा जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांच्याकडे राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे महाजन हे १९८५ पासून आतापर्यंत काँग्रेस पक्षामध्ये विविध पदांवर कार्यरत होते. विशेष म्हणजे विजय महाजन हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एनएसयुआयचे तालुका अध्यक्ष होते तेव्हापासून ते काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून कार्य करीत होते. एरंडोल तालुक्यात राजकीय दृष्ट्या काँग्रेसची बिकट अवस्था असताना महाजन यांनी काँग्रेसच्या हाताच्या पंजाचे लोकांना विसर पडू दिला नाही. त्यांनी सलग चाळीस वर्षे काँग्रेस या एकाच राजकीय पक्षाचा ध्वज हातात धरला होता. मात्र आता त्यांनी वैयक्तिक कारणावरून काँग्रेस पक्षाचा त्याग केल्यामुळे राजकीय क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाचे राजकीय दृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे.