शास्त्री फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस विविध उपक्रमांनी साजरा

शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिवस मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
जागतिक स्तरावर दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी ‘फार्मासिस्ट दिवस’ साजरा केला जातो. २००९ पासून सुरू झालेल्या या परंपरेमागे उद्दिष्ट फार्मासिस्ट या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घटकाचे कार्य अधोरेखित करणे हे आहे. १९१२ मध्ये स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने शास्त्री फार्मसी महाविद्यालयात दिवसभर विविध उपक्रम राबवून सामाजिक जाणीव व शैक्षणिक दृष्टिकोनातून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी एरंडोल शहरातील तिरंगा चौकातून रॅली काढून झाली. ही रॅली आर.टी. काबरा हायस्कूल, मरीमाता चौक, बुधवार दरवाजा, अमळनेर दरवाजा मार्गे परत तिरंगा चौकात दाखल झाली. रॅलीदरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून नागरिकांना फार्मासिस्टच्या कार्याबाबत जनजागृती केली. तसेच पथनाट्य सादर करून औषधोपचारातील योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या रॅलीत एरंडोल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पाटील, माजी अध्यक्ष कैलास न्याती, तसेच मान्यवर मनोहर पाटील व भूषण पाटील विशेष उपस्थित होते. रॅलीच्या समारोपाच्या वेळी शहरातील सर्व कार्यरत फार्मासिस्टांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक मार्गदर्शन व व्याख्यानमाला
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रा. संजय लढे यांनी “शैक्षणिक प्रगतीपुरता मर्यादित न राहता सर्वांगीण विकासावर भर द्या” असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी फार्मसी शिक्षणातील संधी, करिअरचा वेध आणि जागतिक आरोग्य व्यवस्थेत विद्यार्थ्यांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.
समाजोपयोगी उपक्रम
फार्मासिस्ट दिनानिमित्त महाविद्यालयाने समाजाशी नाळ जुळवण्याच्या हेतूने पळासदळ गावात मोफत रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केले. गावकऱ्यांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, तसेच उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शास्त्री म्हणाले, “फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असून, तो औषधोपचारामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावतो. आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्टचे योगदान अनन्यसाधारण आहे.”
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, तसेच उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शास्त्री म्हणाले, “फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असून, तो औषधोपचारामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावतो. आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्टचे योगदान अनन्यसाधारण आहे.”
कार्यक्रमाचे नियोजन डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अनुप कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. जावेद शेख यांनी आभारप्रदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.