नवरात्री दुर्गा नवमी निमित्त ज्येष्ठ महिलांचा सन्मान सोहळा..

प्रतिनिधी एरंडोल : नवरात्रीच्या पवित्र पर्वावर ०१ ऑक्टोबर२०२५ रोजी दुर्गा नवमीच्या मंगलदिनी व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शहरात श्रीराम चौक बुधवार दरवाजा परिसरात ज्येष्ठ महिलांचा सन्मान सोहळा आरोग्य सेविका शोभा पाटील यांच्या संकल्पनेतून
जय श्रीराम प्रतिष्ठान बाल दुर्गा मित्र मंडळाच्या सहकार्याने
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याची सुरुवात देवीची आरती व मंगल गजराने झाली. जिजाबाई चौधरी लिलाबाई पाटील, इंदुबाई पाटील, कमलाबाई जाधव, रंभाबाई पाटील या ज्येष्ठ महिलांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ मातृशक्तींचे आशीर्वचन घेण्यात आले. त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या अनुभवातून पुढील पिढीला मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, अनेक महिलांनी समाजकारण, शिक्षण, कुटुंबसंस्कार व कला-संस्कृती क्षेत्रातील केलेल्या कार्याची उजळणी करून भावनिक क्षण अनुभवले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सेविका शोभा पाटील, राजश्री महाजन या उपस्थित असलेल्या मान्यवरांनी ज्येष्ठ महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित केले. “मातृशक्ती हीच खरी दुर्गा आहे. तिच्या आशीर्वादाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे” असे उद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या शेवटी देवीचे भजन, गरबा-डांडिया तसेच महिलांनी केलेल्या सांस्कृतिक सादरीकरणाने वातावरण रंगले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील सर्व महिला, मुली, पुरुष, मुले यांनी परिश्रम घेतले. यावेळी सदर उपक्रमाचे कौतुक करत दरवर्षी असा उपक्रम व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.