क्रांती ज्योती महिला ग्रुप आयोजित ‘विविध स्पर्धा महोत्सव’ उत्साहात
अमळनेर : विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि महिलांमधील कलागुणांना चालना मिळावी या उद्देशाने क्रांती ज्योती महिला ग्रुप आयोजित तीन दिवसीय विविध स्पर्धा महोत्सव जुना टाऊन हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
दि. २५ रोजी उत्सवाचे उद्घाटन प्रा. डॉ. पी. जे. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात लहान व मोठ्या गटासाठी चौदा विविध स्पर्धा पार पडल्या. स्पर्धांची सुरूवात मोठ्या गटापासून रांगोळी स्पर्धेने झाली. यात लोप पावत चाललेल्या ठिपक्यांच्या रांगोळीने प्रेक्षकांचे मन वेधून घेतले. मेंदी स्पर्धेतही अनेक स्पर्धकांनी सहभाग घेत उत्साहात रंगत आणली. निबंध आणि चित्रकला स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग स्पृहणीय होता. हस्ताक्षर, चारोळी अशा वेगळ्या स्पर्धांनी महिलांना आपलेसे केले. लिंबू-चमचा स्पर्धेत तर महिला आपले वय विसरुन हिरहिरीने सहभागी होत दंग झाल्या.
दि. २६ रोजी वक्तृत्व स्पर्धेद्वार महिलांना आपले विचार मांडता आले. गीत गायन स्पर्धेने श्रोत्यांची मन जिंकली. उखाणे स्पर्धेत ज्येष्ठ महिलांचा उत्साह कौतुकास्पद होता. एकपात्री स्पर्धेत स्पर्धकांकडून विविध भूमिका साकारल्या गेल्या.
दि. २७ रोजी केशरचना आणि सौंदर्यवती स्पर्धेने धमाल उडवून दिली. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले.
या महोत्सवासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य सरचिटणीस तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, ॲड. तिलोत्तमा पाटील, प्रा. डॉ. पी. जे. जोशी, प्रा.मंदाकिनी भामरे, महेंद्र महाजन, माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, स्वादिष्ट नमकीनचे विजय पाटील, विवेक पाटील, राजेंद्र यादव उर्फ मेजर आण्णा, अस्मिता चंद्रात्रे यांनी विविध रूपातून क्रांतीज्योती महिला ग्रुपला मदत करुन ग्रुपचे मनोधैर्य वाढवले.
यशस्वीतेसाठी क्रांतीज्योती ग्रुपच्या सदस्या नीलिमा सोनकुसरे, हेमलता भामरे, योगिता गुजर, रुपाली जोशी, ज्ञानेश्वरी भामरे, दिपाली वैष्णव, कार्यकारिणी सभासद मेघा काळकर, अर्चना देशपांडे, भारती कार्लेकर, दिशा संदांशिव, स्वाती पोळ यांनी परिश्रम घेतले. तसेच आदित्य भामरे, भार्गव भामरे, दर्शन वैष्णव, सलोनी जोशी यांचे सहकार्य लाभले.