क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम चा संगम” युफोरिया २०२५ ” उत्साहात संपन्न

प्रतिनिधी – येथील शास्त्री फार्मसी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली कला, प्रतिभा आणि सामाजिक भान व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून किशोरजी काळकर, महामंत्री भाजपा , प्रतापराव गुलाबराव पाटील माजी जि.प. सदस्य बांभोरी-पाळधी गट,देवेंद्र दंडगव्हाळ, उपसचिव प्रादेशिक तंत्रशिक्षण मंडळ छत्रपती संभाजी नगर, प्रा. राजेंद्र पाटील संचालक, माध्यमिक शिक्षक पतपेढी, संस्थापक अध्यक्ष, धनराज गोपाल कासट व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व संस्थापक सचिव सौ. रूपा शास्त्री तसेच उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये किशोर काळकर यांनी विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार, उभरते शिक्षक पुरस्कार व आदर्श विद्यार्थी पुरस्कार. विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट विद्यार्थी डिप्लोमा मधून अहिरे प्रशांत विजय, उत्कृष्ट विद्यार्थिनी डिप्लोमा मधून तायडे सृष्टी सुनील तसेच उत्कृष्ट प्राध्यापक प्रा. महिला वडवी अनिता, उत्कृष्ट उभरते प्राध्यापक प्रा. पाटील मंगेश प्रल्हाद, उत्कृष्ट नॉन टीचिंग स्टाफ पाटील दिवाकर व निळे प्रशांत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, चेस, कॅरम असे विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तत्पूर्वी वार्षिक स्नेहसंमेलन “युफोरिया २०२५’ या कार्यक्रमाची सुरुवात १ एप्रिल २०२५ पासून करण्यात आली होती. या आठवडाभरात क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच माजी विद्यार्थी मेळावा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, नाट्य, गायन, सादरीकरण यांसारखे अनेक रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग लाभला. ‘फॅशन शो’ व ‘ग्रुप डान्स’ या कार्यक्रमांना विशेष उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी सर्व सहभागी विद्यार्थी व आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. मंगेश पाटील तर कार्यक्रमाचे नियोजन प्रा. राहुल बोरसे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी मधून मयुरी पाटील, राजेश्वर पाटील, संकेत ठोसर, सुश्मिता लोहार यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. राहुल बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.