अंजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही नियोजनाचा अभाव-हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण.

प्रतिनिधी एरंडोल : – येथील नगरपालिकेचा कारभार म्हणजे अजब तुझे सरकार म्हणावे लागेल. नागरीकांच्या तक्रारी वाढल्या असून वसुलीसह पाणीपुरवठा विभागातील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. अंजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असून देखील केवळ नियोजनाअभावी 6 व्या, 7 व्या, 8 व्या दिवशी पाणीपुरवठा होतो यास म्हणावे तरी काय ? उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वांनाच (गुरे, ढोरे, पक्षींसह) पाण्याची गरज भासते. हंडाभर पाण्यासाठी मात्र महिलांना वणवण फिरावे लागते यास म्हणावे तरी काय ?
मार्चअखेर करांची वसुलीसाठी नपाने घरोघरी तगादा लावला असला तरी अनेक नागरीकांनी नपामध्ये जावून करांचा भरणा केला परंतू मागील बाकी भरली असून (केवळ नोंद न केल्याने) देखील त्यांचेवर पावत्या आणा वगैरे अरेरावी केली जाते. त्यामुळे प्रशासकीय कारभार चांगला की नगरसेवकांचा अशी चर्चा रंगू लागली आहे.
पाणीपुरवठा विभागाचा तर अनेक रंजक कथा असून पाईपलाईन दुरुस्ती, वीज पुरवठा आदींचे निमित्त सांगून उशिरा पाणीपुरवठा केला जातो. विशेष खेदाची बाब म्हणजे पाणी केव्हा येणार ?
याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यासाठी तालुक्याचे आमदार अमोलदादा पाटील यांचेकडे देखील पत्रकारांनी, नागरीकांनी तक्रारी केल्या आहेतच. पूर्णवेळ मुख्याधिकारी, प्रशासक असून देखील नपाच्या अनागोंदी कारभाराबाबत मात्र नागरीक संतप्त झाले असून लवकरच उद्रेक होणार अशी चर्चा रंगू लागली आहे.