एमआयडीसीच्या-स्थळ सर्वेक्षणानंतर लवकरच प्रश्न मार्गी लागणार

एरंडोलला आयोजित पत्रकार परिषदेत आ. अमोलदादा पाटील यांची ग्वाही
प्रतिनिधी – येथील एमआयडीसीच्या प्रश्नासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करीत असून स्थळ सर्वेक्षण झाल्यानंतर लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. त्यासाठी एरंडोल शिवार आणि उमर्दे शिवारातील जमीन प्रस्तावित असल्याची माहिती आमदार अमोल पाटील यांनी येथे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
माजी आमदार चिमणराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात एमआयडीसीच्या प्रस्तावा साठी शासन दरबारी अनेकवेळा प्रयत्न केले परंतु दरम्यानच्या काळात हा प्रश्न रेंगाळला होता. आता आमदार अमोल पाटील यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. एरंडोल मधील एम.आय.डी.सीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्योगमंत्री सामंत यांना साकडे घातले व त्यांना हा प्रश्न बेरोजगारी दूर करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले. त्यामुळे उद्योग मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न मार्गी लावण्याची संकेत दिले. आता शासनाकडून एमआयडीसी प्रश्नी प्रत्यक्ष जमिनीचा ताबा घेण्यास कधी सुरुवात होईल याची जनतेला प्रतीक्षा आहे. पद्मालय क्रमांक 2 व अंजनी मध्यम प्रकल्प या प्रकल्पांची रखडलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच निधी उपलब्ध होऊन रखडलेली कामे मार्गी लागतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच एरंडोल बस आगारा साठी आठवडाभरात दहा नवीन बस गाड्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे एरंडोल बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ ही लवकरच होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. एरंडोल बस आगाराचे नूतनीकरण झाल्यानंतर आता असलेल्या सर्व समस्या संपुष्टात येतील आणि हे बसस्थानक जिल्ह्यातील एक सुसज्ज़ असे बसस्थानक असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शिंदे सेनेचे शालिग्रामभाऊ गायकवाड, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, संभाजी पाटील, कुणांल महाजन, मयूर महाजन , अतुल महाजन, बबलू पाटील कृष्णा धनगर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.